LPG Gas Cylinder Price : गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावरच सर्वसामान्यांना आणि विशेषतः हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळालाय. तेल विपणन कंपन्यांनी सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल ₹५१.५० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना बाप्पा पावला रे! असं म्हणावंसं वाटतंय. मात्र, या कपातीचा फायदा सध्या फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरपुरता मर्यादित आहे, घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.LPG Gas Cylinder Price
नव्या दरांनुसार, दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आधी १६३१.५० रुपये होती, ती आता १५८० रुपयांवर आली आहे. कोलकात्यात १७३४.५० रुपयांचा सिलेंडर आता १६८४ रुपयांत मिळतोय. मुंबईकरांनाही दिलासा मिळाला असून इथं सिलेंडरचा दर १५८२.५० रुपयांवरून १५३१.५० रुपये झाला आहे. तर चेन्नईत यापूर्वी १७८९ रुपयांना मिळणारा सिलेंडर आता १७३८ रुपयांना मिळतोय. म्हणजेच देशातील चार प्रमुख महानगरांत एकसमान दिलासा मिळालाय.
या कपातीचा थेट फायदा आता हॉटेल, बार, लॉज, ढाबे, रेस्टॉरंट चालवणाऱ्यांना होणार आहे. सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे स्वयंपाकघराचा खर्च कमी होईल आणि नैसर्गिकरीत्याच जेवणाचे दरही कमी होऊ शकतात. ग्राहकांनाही अप्रत्यक्षपणे याचा लाभ मिळेल.
गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमती सातत्याने कमी होताना दिसत आहेत. जुलैमध्ये ५८ रुपयांनी कपात झाली होती, ऑगस्टमध्ये ३३.५० रुपयांची कपात झाली आणि आता सप्टेंबरमध्ये तब्बल ५१.५० रुपयांनी दर कमी झाले आहेत. म्हणजे सलग तीन महिन्यांत व्यावसायिक सिलेंडर सतत स्वस्त होत गेलाय.
तज्ज्ञांच्या मते, एलपीजी गॅसच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांवर, रुपयाच्या मूल्यासह इतर आर्थिक परिस्थितींवर अवलंबून असतात. सध्या जागतिक बाजारातील परिस्थितीमुळे भारतीय ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. मात्र पुढील काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये बदल झाला तर एलपीजी दरांवरही त्याचा थेट परिणाम होणार हे निश्चित आहे.
एकूणच, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्यानं व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता घरगुती सिलेंडरच्या किमती कमी होतील का, याकडे सर्वसामान्य गृहिणींचं लक्ष लागलं आहे.
( Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही योग्य दर जाणून घेण्यासाठी संबंधित वेबसाईटची माहिती घ्या)
