Banking News | सणांचा मोसम सुरू झाला आहे आणि त्याचा परिणाम थेट बँकांच्या कामकाजावर दिसतो आहे. येत्या काही दिवसांत देशातील अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही बँकेत प्रत्यक्ष जाऊन एखादं काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी सुट्टींची यादी तपासून मगच बाहेर पडा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सप्टेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर केली आहे. या यादीप्रमाणे उद्या म्हणजेच शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी देशातील अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. Banking News
कोणत्या शहरांमध्ये उद्या बँका बंद?
आरबीआयच्या माहितीनुसार, ईद-ए-मिलाद-उन-नबी आणि ओणम या सणांच्या पार्श्वभूमीवर उद्या अनेक शहरांत बँका बंद राहतील. त्यामध्ये अहमदाबाद, आईजॉल, इंफाळ, कानपूर, कोची, चेन्नई, जम्मू, तिरुअनंतपुरम, डेहराडून, नागपूर, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, मुंबई, रांची, लखनौ, विजयवाडा, श्रीनगर आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. म्हणजेच, या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी उद्या बँकेत जाण्याचा बेत आखला असेल तर तो पुढे ढकलावा लागेल.
ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार
तथापि, बँका बंद असल्यामुळे तुमचं काम पूर्णपणे थांबणार नाही. डिजिटल बँकिंग सेवा पूर्ववत सुरू राहतील. UPI, NEFT, RTGS, IMPS आणि ATM सारख्या सुविधा नेहमीप्रमाणे उपलब्ध असतील. त्यामुळे तुम्हाला पैशांचे व्यवहार ऑनलाइन करता येतील. मात्र, जर एखादं महत्वाचं कागदपत्र बँकेत जमा करायचं असेल किंवा चेक वगैरेचं काम असेल, तर उद्याची सुट्टी लक्षात घेऊन आधीच ते काम पूर्ण करणं हितावह ठरेल.
ग्राहकांनी काय लक्षात ठेवावं?
सणांच्या काळात सलग सुट्ट्यांचा परिणाम बँकिंग सेवांवर होऊ शकतो. त्यामुळे रोख रकमेची गरज असेल तर एटीएममधून आधीच पैसे काढून ठेवावेत. ऑनलाइन सेवा सुरू असल्या तरी, नेटवर्क किंवा तांत्रिक अडचणींमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे गरजेचे व्यवहार आणि कागदपत्रं वेळेत पूर्ण करणं महत्त्वाचं आहे.
