Maharashtra SSC Exam Timetable 2026: गेल्या वर्षी परीक्षांच्या वेळापत्रकात अचानक बदल झाल्यामुळे गोंधळ उडालेला अजूनही पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनातून गेलेला नाही. काही शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण न होता परीक्षा लागल्या, काही ठिकाणी शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासायला पुरेसा वेळच नव्हता. त्यामुळे निकाल जाहीर करण्यात उशीर, प्रवेशप्रक्रियेत उशीर आणि त्याचा थेट परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रवासावर झाला. हाच धडा लक्षात घेऊन यंदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच SCERT महाराष्ट्रने सावध भूमिका घेतली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी SCERT ने पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वेळापत्रक आधीच आखून प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असून, पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात नियोजित करण्यात आल्या आहेत.
मागच्या वर्षीचा अनुभव आणि टीका
मागच्या वर्षी अचानक मार्च महिन्यात राज्यातील सर्व शाळांसाठी वार्षिक परीक्षा आणि पॅट (संकलित मूल्यमापन चाचणी) यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालल्या. त्यामुळे शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आणि निकाल तयार करण्यासाठी फक्त ५ दिवसांचा अवधी मिळाला. अनेक शाळांमध्ये गोंधळ उडाला.
पालक संघटना, शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञांनी या निर्णयावर प्रचंड टीका केली. कारण परीक्षा वेळेत घेतल्या तरी त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही. निकाल उशिरा लागले, प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी वाढल्या आणि अखेरीस अकरावीचे वर्ग सुरू होईपर्यंत ऑगस्ट महिना उजाडला.
यंदा घेतलेली खबरदारी
यंदा मात्र SCERT ने परीक्षांचे वेळापत्रक वेळेआधीच निश्चित केलं आहे. यामुळे शाळांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करता येणार आहे. फेब्रुवारीत दहावीच्या परीक्षा आणि एप्रिलमध्ये इतर वर्गांच्या परीक्षा असा स्पष्ट आराखडा जाहीर झाला आहे.
SCERT चं म्हणणं आहे की, परीक्षांचे वेळापत्रक लवकर कळाल्याने शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करायला वेळ मिळेल आणि शिक्षक-विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल.
शाळांची प्रतिक्रिया
नाशिकमधील एका मुख्याध्यापकांनी सांगितलं, “गेल्या वर्षी अचानक वेळापत्रक आलं आणि आमच्या शाळेत मुलांचा अभ्यासक्रम फक्त ८५%च पूर्ण झाला होता. बाकी उरलेल्या भागासाठी आम्हाला स्पेशल क्लासेस घ्यावे लागले. यंदा वेळापत्रक आधी मिळालंय हे चांगलं झालं.
तर पुण्यातील एका शिक्षकांनी सांगितलं, “फेब्रुवारीत दहावीची परीक्षा म्हणजे मुलांना आधीपासून मानसिक तयारी करता येईल. पण खरी परीक्षा म्हणजे निकाल वेळेत लागतो का आणि अकरावीचे वर्ग वेळेवर सुरू होतात का हे पाहणं.
पालकांचा दृष्टिकोन
पालकही थोडे साशंक आहेत. मुंबईतील एका पालकांनी सांगितलं, आम्ही बघितलंय की परीक्षा वेळेत झाल्या तरी अकरावीचे वर्ग सुरू होण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर लागतो. त्यामुळे माझ्या मुलाचं चार-पाच महिने शून्य जातात. जर हा प्रश्न सुटला नाही तर वेळापत्रक जाहीर करूनही फारसा उपयोग नाही.
(disclaimer वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे)
