सोन्याचा भाव कोसळा? नवीन दर काय

Gold Rate Today | आज सकाळपासून सराफा बाजारात एक वेगळच वातावरण आहे. तर अनेकांना वाटते सोन्याचा भाव कोसळला किंवा कमी होईल परंतु एक सांगू इच्छितो सध्या परिस्थिती वेगळीच आहे. दुकानाबाहेर लांबच लांब रांगा नाहीत पण प्रत्येक जण मोबाईल हातात घेऊन कुणी वेबसाइट स्क्रोल करत तर कुणी व्हॉट्सॲप ग्रुपवर भाव तपासत आहे. कारण सरळ आहे सोन्याचांदीने पुन्हा एकदा उडी घेतली आहे आणि लोकांच्या मनातल्या हिशोबाला सगळीकडे उधाण आलंय. कालपर्यंत जी आकडेवारी होती, त्यातल्या तुलनेत आज २४ कॅरेट सोने तब्बल ३५५ रुपयांनी वाढून १०१२३९ रुपयांवर पोहोचलं. चांदीही मागे नाही, तिने ८१८ रुपयांची उडी मारत ११६५२५ रुपयांवर ठाण मांडलं. जीएसटी धरून पाहिलं तर आकडे अजून टोकाला जात आहेत सोने १०३८५१ रुपये तर चांदी १२०१८८ रुपये किलो. हे ऐकून प्रत्येकाच्या मनातला तोच प्रश्न अजून खरेदी करायचं का थांबायचं? Gold Rate Today


बाजार तज्ञ सांगतात की, ही वाढ काही उगाच झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात चलनातील अस्थिरता, जागतिक तणाव, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील हालचाली आणि कच्च्या तेलाच्या किमती यांचा थेट परिणाम सोने-चांदीवर होतो. गुंतवणूकदार भीतीत असले की ते सुरक्षित ठिकाणी पैसे वळवतात आणि सोनं-चांदी हे शतकानुशतकं सुरक्षित मानलेलं ठिकाण. हाच परिणाम सध्या आपल्या बाजारावरही दिसतोय. IBJA च्या आकडेवारीनुसार मंगळवारी सोनं १००८८४ रुपयांवर बंद झालं होतं आणि चांदी ११५८७० रुपयांवर. बुधवारी गणेश चतुर्थीमुळे दर जाहीर झाले नव्हते. त्यामुळे आज अचानक जाहीर झालेल्या आकडेवारीने बाजारात खळबळ उडाली.

आज जर आपण कॅरेटनुसार बघितलं तर, २३ कॅरेट सोने १००४८० रुपये तर २२ कॅरेट सोनं ९२२१० रुपयांवर पोहोचलं आहे. १८ कॅरेट सोनं ७५६६३ रुपये आणि १४ कॅरेट सोने आता ६१००१ रुपयांवर आहे. शुद्धतेनुसार दर कमी-जास्त होतात पण आकडे सगळीकडे एकाच दिशेने म्हणजे वरच्या बाजूला जात आहेत. बाजारातले सराफ म्हणतात की ही फक्त सुरुवात आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या लग्नसराईला अजून मागणी वाढेल, तेव्हा दर आणखी उंच जाणार हे नक्की, असं पुण्यातील एका सराफाने सांगितलं.

पण या सगळ्याचा थेट परिणाम सामान्यांवर होतोय. ग्रामीण भागात जिथं सोनं म्हणजे थेट बचतीचा आणि प्रतिष्ठेचा मापदंड, तिथं लोक थोडे अस्वस्थ झाले आहेत. कारण शेतीचं पीक अजून हातात नाही, पण दागिने घ्यायची वेळ आलीय. दुसरीकडे शहरी मध्यमवर्गाला गुंतवणुकीसाठी सोने हवंय, पण हप्ते, लोन, घरखर्च सगळं सांभाळताना खिशाला झळ बसते. म्हणून काहीजण आता ‘डिजिटल गोल्ड’ कडे वळत आहेत, जिथं १०० रुपयांतही सोनं घेता येतं.

चांदीबाबत मात्र थोडा वेगळा माहोल आहे. उद्योगधंद्यात, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये आणि सोलर पॅनलमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे तिची मागणी सतत असते. त्यामुळे चांदीच्या दरातली वाढ थोडी अधिक स्थिर आहे. पण सराफांच्या मते येणाऱ्या दिवाळीत चांदीच्या दागिन्यांची मागणीही जबरदस्त होईल आणि किंमती आणखी कडाडतील.

तज्ज्ञ सांगतात की, पुढच्या काही दिवसांत दर अजून बदलतील. जर डॉलर मजबूत राहिला तर सोने किंचित थांबेल, पण जागतिक अनिश्चितता वाढली तर २४ कॅरेट सोनं १ लाख २ हजारांच्याही वर जाऊ शकतं,असा अंदाज दिल्लीतल्या एका बाजार विश्लेषकाने व्यक्त केला.

पण खरी गंमत अशी आहे की, या सगळ्या आकड्यांमागे भावना मोठ्या आहेत. मुलीचं लग्न, सण-वार बचत, भविष्याची सुरक्षितता हे सगळं सोन्याशी जोडलेलं आहे. म्हणूनच जेव्हा भाव वाढतात तेव्हा माणूस हिशोबापेक्षा जास्त भावनांनी हलतो. म्हणूनच आत्ताच्या घडीला सगळीकडे एकच चर्चा सोनं आता किती वाढणार? अजून खरेदी करायचं का थांबायचं?

Leave a Comment