Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. तर राज्यातील इतर भागांसाठी यलो? (Yellow Alert) अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
कोकणात पावसाचा जोर वाढणार (Rains will increase in intensity in Konkan)
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम सरी सुरू होत्या; मात्र आजपासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस (Rain also in Marathwada and Vidarbha)
मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि नाशिक घाटमाथ्यावरही पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाही भागात गेल्या 24 तासांत तब्बल 111 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपूर मात्र 32.8 अंश सेल्सिअस तापमानासह राज्यातील सर्वाधिक उष्ण ठरलं आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पुन्हा गती मिळाली आहे. या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा आणि चिंता
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून विशेषतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून आणखी सक्रिय होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरू शकतो. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
